शनिवार, ७ डिसेंबर, २०१९
जीवन
शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९
Bhagwadgita
१ -अर्जुन विषाद योग
धृतराष्ट्र म्हणाला हे संजया, धर्मक्षेत्र असलेल्या कुरूक्षेत्रात युद्धासाठी तयार असलेले माझे पुत्र व पांडुकुमार काय करत आहेत ते मला सांग. संजय म्हणाला, पांडवांच्या सैन्याचा व्युह पाहुन दुर्योधन भीष्मा जवळ जाऊन म्हणाला, तुमचा शिष्य ध्रुष्टद्युम्नाने रचलेला व्युह पहा. पांडवाची ही प्रचंड सेना दले पहा.
अनेक धनुर्धारी आहेत तसेच द्रुपद, सात्यकी, विराट हे ही रणांगणात भीम, अर्जुना समान शोभत आहेत.
वीर असे ध्रुष्टकेतु व चेकितात, महान असे पुरूजित, कुंतिभोज, शैब्य, शूर असा ऊत्तमौजा आणि पराक्रमी युधामन्यु, द्रौपदीचे पुत्र व अभिमन्यु. द्विजश्रेष्ठा ! आता आपल्याकडील सेनानायक होण्यासारखे प्रधान वीर पण सांगतो. आपण स्वत: सारख्या व्यक्ति व भीष्म, कृपाचार्य, कर्ण, भुरिश्रवा, अश्वत्थामा आणि विकर्ण.
हे सर्वजण शूर, शास्त्रात पारंगत आणि य़ुद्धात अनुभवी असुन माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहेत. भीष्मरक्षित असे आपले सैन्य दल (बल) अमर्याद आहे. भीमरक्षित सेना मला मर्यादित दिसते आहे व सर्व सैन्याला म्हणाला स्वस्थानावर दक्ष राहुन लक्ष ठेवा व भीष्म रक्षणासाठी तुमचे सामर्थ्य एकटवा. भीष्मानी केलेला शंखनाद हा जणु सिंहनादच वाटतो आहे. तो ऐकुन दुर्योधनाला अत्यंत आनंद झाला. नंतर शंख, ढोल व रणवाद्यांच्या आवाजाने गगन दुमदुमुन गेले.
शुभ्र अश्व रथात बसुन पांडव व श्रीकृष्ण आले. त्यांनी त्यांचे दिव्य शंख स्व प्राणाने फुंकले. कृष्ण व अर्जुनाने पांचजन्य, देवदत्त हे शंख फुंकले. भीमाने स्वत:चे नाव धन्य करणारा पांड्रु महाशंख फुंकला. कुंतीपुत्र युधिष्ठीराने अनंत विजय फुंकला. नकुल व सहदेव यांनी
चांगला आवाज करणारा मणिपुष्पक फुंकला. सात्यकी, विराट, सेनापती धृष्टद्युम्न, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, आणि हे राजा ! अभिमन्यु हे पण वेगवेगळे शंख वाजवत आहेत. या सर्वांच्या प्रचंड आवाजाने आकाश व पृथ्वी थरथरु लागली आहे. धृतराष्ट्र पुत्रांच्या ह्रदयाचा थरकाप झाला आहे. ज्याच्या रथावरील ध्वजावर हनुमान आहे अशा अर्जुनाने कौरव युद्धासाठी सज्ज आहेत असे पाहून आपले धनुष्य उचलले आहे.
कृष्णाशी अर्जुन काय बोलत आहे पहा । अर्जुन म्हणाला , हे अच्युत रथ सैन्यांच्या मधोमध नेउन ठेव. मला येथे युद्धासाठी कोण कोण आले आहे ते पहावयाचे आहे. कोण राजे जमलेले आहेत व कोण कौरवांचे बाजुनी लढण्यासाठी आले आहेत ते पहातो. अर्जुनास दिसले ते सर्व त्याचे चुलते, वाडवडील, गुरूबंधु, पुत्र पौत्र, मित्र, मामा. दोन्ही सैन्यामधे मित्र व नातेवाईक दिसले. असे सर्व रक्ताच्या नात्याचे लोक पाहून करुणेने व्याकूळ होऊन अर्जुन दु:खाने म्हणाला, हे सर्व माझेच आप्त आहेत. माझ्या घशाला कोरड पडते आहे, शरीर शिथील पडु लागले आहे, शरीराला कंप येतोय, धनुष्याचे त्वचेला चटके बसत आहेत. माझे मन भरकटते आहे, ऊभे राहणेही अशक्य झाले आहे.
केशवा ही उलटी(विपरीत) लक्षणे दिसत आहेत. आपल्या प्रिय अशा सर्वाना मारुन कोणते श्रेय मिळवायचे. कृष्णा, मला विजय नको, अशा राज्याचे भोग मला कदापिही नकोत. या रणांगणावर जे आपले प्राण व धनाचा विचार न करता युद्धासाठी ऊभे आहेत त्यानाच राज्य सुख द्यावे. गुरुजन, मुले, आजोबा, सासरे, मेहुणे, नातु, मामा, नातेवाईक, याना जरी यांनी मला मारले तरी मारु इच्छीत नाही. मला पृथ्वीच काय त्रिलोक पण नको. या धृतराष्ट्र पुत्राना मारुन काय सुख मिळणार. यांना मारले तर पापच लागेल. हे कृष्णा कौरवाना मारण्यात मला कुठेच सुख दिसत नाही. मित्र द्रोह, कुळ नाशा सारखे हे पाप आहे. लोभी अशा याना काही दिसत नसले (कळत नसले) तरी हे जनार्दना, मी हे पाप का करु? (या पापाचा त्याग का नको करु). याचा परिणाम म्हणजे कुळाचा नाश होणार आहे हे कळत का नाही ?. पुर्वापार चालत आलेले कुलधर्म बुडवुन कुळाचा नाश होईल. कुळामधे अधर्म पसरेल. कृष्णा, धर्म सोडला तर लेकी सुना बिघडतील. हे देवा , वर्ण संकराचे संकट कोसळेल.(अवांछित प्रजा निर्मिती चे) कुळातील तर्पण श्राद्धे थांबतील. कुळ आणि कुळ बुडव्याना नरकात जावे लागेल.
वर्ण संकर दोषाने कुळाचा घात करणाऱ्यांचे जाती धर्म उखडले जातील. हे जनार्दना, मी असे ऐकले आहे की , कुलधर्म संपताच मनुष्याला अनंत काळासाठी नरकात जावे लागते. आम्ही बुद्धिमान असुनही हे महा पाप करण्यास तयार झालो आहोत. सुख आणि राज्य लोभाने मारण्यासही तयार आहोत. मला निशस्त्र राहुन, कौरवानी जरी शस्त्र घेउन प्रहार केला तरी प्रतिकार न करणेच योग्य वाटते. असे बोलुन अर्जुन शोकमग्न होउन धनुष्य बाण खाली ठेवुन रथा मधे बसला.
अर्जुन विषाद योग नावाचा हा प्रथम अध्याय.
बुधवार, २२ मे, २०१९
Autobiography of a Yogi
श्री स्वामी परमहंस योगानंद , परमावतार बाबाजी व भारतीय गुरुपरंपरेला वंदन करून मी या ग्रंथाबद्दल लिहित आहे.
स्वामी परमहंस योगानंद हे ' स्वामी ' पदाला कसे पोहचले या वाटचालीतील अनुभव व आध्यात्मिक प्रगती तसेच त्यांचे कार्य याबद्दल वाचणे हा एक सात्विक अनुभव आहे.
यामध्ये आपल्याला " सिद्ध पुरुष " , व क्रियायोग यांची माहिती मिळते , आपले आध्यात्मिक ज्ञान किती उच्च पातळीचे आहे ते कळते. परदेशा मधे क्रियायोगाच्या प्रसाराचे महान कार्य करणाऱ्या ' स्वामींंचे ' अनुभव वाचणे व समजून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे असे मला वाटते.
सदर चरित्रातील प्रत्येक विभागाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
बालपण -
सुरुवातीलाच स्वामींनी गुरुशिष्य संबंध व
'परमतत्वाचा शोध ' ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये समजली जातात आणि त्यांच्या आयुष्यातील मार्ग त्यांना परमेश्वर स्वरूप ऋषीतुल्य गुरूंकडे घेऊन गेला असे सांगितले आहे.
आठवणी - स्वामींना ते मागील जन्मी ' योगी ' म्हणून हिमालयात राहत हे आठवत असे.
ते म्हणतात की माझ्या लहानपणच्या आठवणी विलक्षण अशा नाहीत.
श्री भगवतीचरण घोष यांचे ते चवथे अपत्य. नांव मुकुंदलाल. चार भाऊ व चार बहिणी असे कुटुंब होते. वडिल असाधारण गणितज्ञ व तर्कशास्त्री होते. आई या भावंडांना धर्मग्रंथातील गोष्टी सांगत असे व वळण लावीत असे. आईचा दानधर्माकडे कल होता .
वडिलांचे वागणे शिस्तबद्ध होते. त्यांनी रेल्वेत नोकरी करत असताना बोनस साठी अर्ज केला नाही. नंतर हिशेब तपासणी मधे हे लक्षात आल्यावर त्यांना १२५००० रू. देण्यात आले. तेव्हा ते म्हणाले ' एवढे काय पैशासारख्या बाह्य फायद्यानी फुशारून जायचे.' ते लाहिरी महाशयांचे शिष्य कसे झाले ही गोष्ट महत्त्वाची आहे. घरात लाहिरी महाशयांचे छायाचित्र होते. या छायाचित्रा समोर मुकुंदलाल ध्यान लावून बसत. या छायाचित्राने त्यांच्या जीवनावर प्रभावी परिणाम केला होता.
स्वामी आठ वर्षांचे असताना त्याना छायाचित्रातुन आशिर्वाद मिळाले. मुकुंदलालना कॉलरा झाला व त्यावर डॉक्टरी उपाय चालत नव्हते तेव्हा आईने त्यांना उशाशी टांगलेल्या लाहिरी महाशयांच्या छायाचित्राकडे नमस्कार करून पाहण्यास सांगितले , त्याप्रमाणे त्यांनी केले असता खोलीला व मुकुंदलाल याना दिपवून टाकणारा प्रकाश दिसला व रोगाची लक्षणे निघून गेली व ते बरे झाले. त्यानंतर ध्यानामध्ये हिमालयामधील योगींबरोबरच्या संवादातून परमेश्वराचा शोध घेण्याची त्यांची जिज्ञासा दृढ झाली.
रविवार, २८ एप्रिल, २०१९
पुस्तक परिचय
बुधवार, २४ एप्रिल, २०१९
ऑपरेशन ऐंटेबी
रवींद्र गुर्जर
फ्रेंच विमानाचे दहशतवाद्यांकडून अथेन्स मधुन अपहरण झाले. त्या विमानामध्ये ज्यु, इस्राएली, प्रवासी जास्त होते. इतरही देशांचे प्रवासी होतेच.
युगांडा दहशतवाद्यांना सहकार्य करत असल्याने विमान युगांडातील एन्टेबी येथे उतरविण्यात आले.
तेथे युगांडाचे सैनिक व दहशतवाद्यांच्या पहाऱ्यात सर्वांना एका इमारतीत ठेवण्यात आले.
इस्राएली व ज्युंना बाजूला काढण्यात आले.
हे विमान फ्रेंच असल्याने फ्रेंच सरकारने हस्तक्षेप करावा अशी इस्राएल सरकारने विनंती केली. दहशतवाद्यांनी त्यांच्या मार्फत वाटाघाटी करण्याचे मान्य केले. इदी अमीन पुर्णपणे दहशतवाद्यांच्या बाजुने होते. खरेतर आधी इस्राएल बरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. परंतु एकदा त्यांनी शस्त्र पुरवठा नाकारल्याने ते बिघडले.
वाटाघाटी सुरु झाल्या नंतर दहशतवाद्यांना
इतर देशांतील कैदी सोडावे असे सांगितले. त्यामुळे काही इतर देशांतील नागरिकांना सोडण्यात आले. अमीन ज्यू नागरिकांची चौकशी करण्याचे , त्यांना मदत करण्याचे नाटक पुरेपूर वठवत होते. त्यांचे इस्राएल मधील मित्र बार लेव्ह यांनी अमीन यांना फोन करून त्यांची भरमसाट स्तुती केली व सांगितले की तुम्ही जर या लोकांना सोडविण्यात यश मिळविले तर तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळेल. अमीन म्हणाले की दहशतवाद्यांकडे खूप स्फोटक द्रव्ये आहेत, मी तसा प्रयत्न केल्यास ते सर्व प्रवाशांना ठार मारतील.
हे संभाषण इस्राएल सरकारला कळले.
अमीन यांचे हेतू स्पष्ट झाले होते. इस्राएल संरक्षण दलाने एक योजना आखली. त्यांची योजना एक हवाई लष्करी पथक पाठवून या प्रवाशांना मुक्त करण्याची होती. दहशतवाद्यांनी गुरुवार अंतिम मुदत दिली. इस्त्रायली सरकारने वाटाघाटी करण्यास मान्यता दिली, पण त्या लांबतील अशी व्यवस्था केली. तातडीची बैठक झाली, त्यात सगळ्यांचे मत पडले की आता माघार घेणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे आहे. तेव्हा या मागण्या मान्य करता कामा नये. संरक्षण मंत्र्यांनी आपली योजना सर्वांकडे मांडली. परंतु त्यात खूप अडचणी होत्या. त्यासाठी जी अमेरिकन विमाने वापरावयाची होती ती वापरल्यास अमेरिका शस्त्र पुरवठा बंद करण्याची शक्यता होती. कारण हा पुरवठा बाह्य आक्रमण झाल्यास आत्म संरक्षण करता यावे अशा दृष्टीने केला जातो. दुसरी गोष्ट योजना असफल ठरल्यास वैमानिक पथक आणि सर्व प्रवासी यांचा मृत्यू अटळ होता. आणि परीणामी मंत्री मंडळ ढासळण्याची शक्यता होती. अखेर निरपराध लोकांचे जीवन ही गोष्ट महत्त्वाची मानली जाऊन या योजनेला मान्यता देण्यात आली. या योजनेला ऑपरेशन जोनाथन असे नाव देण्यात आले कारण या मोहिमेचे प्रमुख होते जोनाथन उर्फ यॉनी. हे एक हुशार व कार्यक्षम असे अधिकारी होते. त्यांनी सर्व योजना राबवली.
अनेक वेळा हल्ल्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आणि ग्रीन सिग्नल मिळताच हवाईदलाची हर्क्युलस जातीची उत्तम दर्जाची विमाने हवेत उडाली. त्यांनी रडार क्षेत्रात न येण्याच्या दृष्टीने ढगाखालुन कमी उंचीवरून प्रवास केला व ती यशस्वीरित्या एन्टेबीत पोचली. तेथील एका दुरच्या धावपट्टीवर उतरली. रडार केंद्रातील लोकांच्या गाफील गिरी मुळे ही गोष्ट अधिक सोपी झाली. विमानातून उतरल्या उतरल्या इस्त्रायली सैनिकांनी वादळी वेगाने कामे केली. ज्या इमारती मध्ये दहशतवादी व प्रवासी होते तेथे जाऊन दहशतवादी व युगांडा सैनिक याना मारुन ती इमारत तसेच दळणवळण खात्याची इमारत, रडार केंद्र ताब्यात घेतले. तिथे असलेल्या एका टॉवरवरून युगांडा सैनिकांनी प्रतिहल्ला चालू केला. त्याला स्वतः जोनाथन प्रत्युत्तर देत होते पण अचानक काही कारणाने ते वळले व त्यांच्या पाठीत गोळी लागून ते मरण पावले.
इस्राएल सैनिकांनी त्यांना बाजूला नेऊन ठेवून काम चालु ठेवले. तिकडे सर्व प्रवासी घाबरले होते त्यांना वाटत होते की आपल्या सरकारने बोलणी बंद केल्याने दहशतवादी आपल्याला मारण्यासाठी आले असावेत.
पण लवकरच त्यांच्या लक्षात सर्व गोष्टी आल्या व ते शूर सैनिकांच्या आज्ञे प्रमाणे विमानाकडे पळत सुटले. प्रवासी, जखमी , मृत सैनिक आणि जोनाथन याना पण विमानात सुरक्षितपणे आणण्यात वैद्यकीय पथकाने यश मिळवले. सर्वच्या सर्व प्रवासी एक हॉस्पिटलमध्ये असलेल्या बाई वगळता विमानात आले व विमाने सुरक्षितपणे इस्राईलमध्ये पोचली.
त्याचवेळी बार लेव्ह यांनी अमीन यांना फोन करून धन्यवाद दिले. तेव्हा अमीन गोंधळले व म्हणाले धन्यवाद कशासाठी मी अजून काहीच केले नाही , तुम्ही लवकर आपला निर्णय कळवा नाही तर दहशतवादी प्रवाशांना ठार मारतील तेव्हा लेव्ह नुसते हसले. थोड्या वेळाने परत अमीन चा लेव्ह यांना फोन आला. ते म्हणाले मैत्रीने दगा दिला. तुम्ही केलेले हे कृत्य लांच्छनास्पद आहे. माझा एक विमानतळ नष्ट झालाच पण काही सैनिक मारले गेले. आणि शेवटी फोन ठेवताना ते म्हणाले 'एक राजकीय नेता किंवा अध्यक्ष म्हणून नाही तर एक खंदा सेनापती या नात्याने मी तुम्हाला सांगु इच्छितो की हा पराक्रम अद्वितीय आहे, तुमच्या विमान दलाला व राष्ट्राला भूषणावह आहे.
.