बुधवार, १० डिसेंबर, २०२५

मी आणि सिनेमा, गाणी

 सिनेमा आणि गाणी-

हिंदी मराठी सिनेमाचा १९७० ते १९९० हा काळ वेगळाच होता.
कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीत पद्मा, शाहू, राजाराम, रॉयल, प्रभात ही पाच, तर व्हिनस , लिबर्टी व उषा ही तीन व्हिनस कॉर्नरला, बसंत , बहार कलेक्टर ऑफीसजवळ तर उमा , पार्वती एका सरळ रस्त्यावर, महाद्वार रोड वर सरस्वती , लक्ष्मी व कावळा नाक्याकडे संगम अशी सर्व भागात १५ टॉकीज त्यावेळी होती आणि सर्व टॉकीज भरपूर सिनेमासक्त लोकांमुळे तेजीत होती. आता महिनाभर पण एक सिनेमा चालत नाही तेव्हा गोल्डन ज्युबिलीचा बोर्ड सर्रास लागत असे.
सकाळी ११ ते रा. १पर्यंत या भागात प्रचंड वर्दळ असायची. अभिनेते, अभिनेत्री यांचे फॅन्स हे एकच सिनेमा सात वेळा बघितला असे सांगत असत.
फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणारे खरे रसीक आणि त्यात कहर म्हणजे मिळेल त्या ब्लॅकच्या दरात तिकीट घेऊन सिनेमा बघणारे पण काही कमी नव्हते. ब्लॅकचा एक वेगळाच फंडा होता कारण जसे चौपट दर देणारे पण असत तसेच सिनेमा चालू होइपर्यंत थांबून आहे त्या दरात किंवा अर्धा तास थांबून निम्म्या दरात तिकीटे मिळवणारे पण असत. सिनेमा बघायला येणारा जो सिनेमा बघायला आला असेल त्याचे तिकीट नाही मिळाले तरी जवळच पर्याय उपलब्ध असलेने दुसरा सिनेमा बघू शकत असत. काही महाभाग तिकीट काढून सिनेमाच्या सुरवातीपासून झोप काढत असत. फर्स्ट, स्टॉल, बाल्कनी‌ व बॉक्स असे क्लास असत.बुकींग ऑफीसवर रांगा लागायच्या. फर्स्ट आणि स्टॉलसाठी तिकीट मिळवणे म्हणजे टास्क असायचा. एका अरुंद बोळातून धक्काबुक्की करणारे, भिंतीवर चढणारे प्रेक्षक हे सगळीकडे दिसणारे दृश्य असे. तिकीट मिळालेले प्रेक्षक हातात घेउन नाचत यायचे.
त्या काळातील पिक्चर्स तीन तासाचे असायचे. 
मेरा नाम जोकर चार तास ४ मिनीटांचा होता. मला तीन वेळा बघितल्यावर समजलेला ग्रेट शोमॅनचा सिनेमा.
थिएटरमध्ये पिक्चर सुरु झाल्यावर येणारे हमखास शिव्या खात असत कारण डोअरकिपरने बॅटरी मारल्याने उजेड व्हायचाच पण येणारा पायावर पाय द्यायचा.
ट्रेलर्स झाल्यावर सिनेमा दाखवत असत.
सिनेमा च्या संवादाना ओरडून तर गाण्याना नाणी फेकून प्रतिसाद दिला जात असे. हिरोला हाण मार असे सल्ले पण दिले जात असत.
त्यावेळी पत्रलेखन हा छंद होता व त्यात सिनेमा ,गाणे, पुस्तक, बिंदू चौकातील सभा हे विषय प्रमुख होते.
मी त्यावेळी किनारा या सिनेमातील मांडू येथे चित्रित झालेल्या गाणे पहाताना पूर्ण गुंतलो होतो व काय वाटले होते ते लिहीले होते पण ती वही एका माणसाने वाचतो म्हणून घेतली आणि नंतर हरवली असे सांगितलेने उपलब्ध नाही व स्मरणात नाही.
किनारा हा एक भारी दिग्दर्शक,कसलेले कलावंत , मधुर संगीतकार लाभलेला पाहीलाचं पाहिजे असा चित्रपट होता.
त्यातील सर्वच गाणी श्रवणीय, अर्थपूर्ण होती. पण लतादीदींच्या निधनानंतर सर्वात जास्त लावले गेलेले *नाम गुम जाएगा* हे भावनांचे उत्कट प्रगटीकरण करणारे होते.
१९७७ साली प्रदर्शित झालेला गुलजार दिग्दर्शित व हेमामालिनी, धर्मेंद्र , जितेंद्र अभिनीत किनारा ला आर डी बर्मन यांचे संगीत लाभले होते.
हेमामालिनी -वसुंधरा धर्मेंद्र -अच्यूत जितेंद्र इंद्रजित.
वसुंधरा ही क्लासिकल डान्सर असते. अच्युत या कवीवर तिचे प्रेम असते अच्यूतच्या अपघाती निधनामुळे वसुंधरा तणावाखाली असते ल त्याच्या आठवणीत गुरफटलेली असल्याने इंद्रजित मध्ये अंतर राखते. इंद्रजित भावुक व समजुतदार व्यक्ती आहे. पण क्लायमॅक्स आहे की तोच अपघाताला जबाबदार आहे.
नाम गुम जाएगा हे गाणे अशावेळी आहे की वसुंधरा आपल्या भुतकाळातील आठवणीत गुंतली आहे व इंद्रजित तिथे तीच्या भावना समजून घेत वावरत असतो. या गाण्यात जितेंद्रनी चेहऱ्यावरील हलक्या बदलातून पण भावना प्रकट केल्या आहेत. जितेंद्रवर कॅमेरा थोडा वेळ असला तरी त्याला वाटणारी सहानुभुती दाखवण्यात यशस्वी झाला आहे. हेमामालिनी व त्याच्या नजरेतील संवाद गुलजार चा कॅमेरा सहजपणे प्रगट करतो. धर्मेंद्र या गाण्यात नसला तरी ॲक्शन हिरो या त्याच्या प्रतीमे पेक्षा अभिनय प्रधान भुमिका होती.
हेमामालीनी ची भावमुद्रा हा या गाण्याचा आत्मा होता. या गाण्यात नृत्य नव्हे तर अभिनयाला प्राधान्य होते . प्रसिद्धी, नाव ,सौंदर्य हे नश्वर आहे हे तिला उमगले आहे हे तीच्या चेहऱ्यावरील भाव प्रगट करतात.
मांडूतील किल्ला- तेथील मोकळी‌ जागा ,कमानी,‌ दुरवरची टेकडी खुले आकाश व एकाकी वाट याचा गाण्यातील भावना दाखवण्यासाठी चांगला वापर केला आहे.
मानवी अस्तित्वाची नश्वरता पण स्मृतींची अमरता हा गहन विचार मांडणारे हे लतादीदींच्या प्रभावी आवाजामुळे श्रवणीय तर आहेच पण विचार करायला लावणारे आहे. हे गाणे व चित्रपट एकदा पहाच.

शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

गाणे

आमचा काळ कॅसेट चा होता. ' झंकार ' मध्ये यादि देऊन आणलेल्या कॅसेटवर गाणी ऐकणे हा वाचनाबरोबरचा छंद. गाणी आवडत असली तरी पुस्तक परिक्षण व चित्रपट परिक्षण याप्रमाणे गाण्यावर लिखाण केले नाही. परवा भय इथले संपत नाही या गाण्याचे खरे तर कवितेचे रसग्रहण वाचले आणि लिहावे असे वाटले. कवितेतील शब्द , संगीत आणि गाणारा सुंदर आवाज एक श्रवणिय व रसग्रहणीय गाणे बनवतात. कानावर पडलेले गाणे ऐकणे आणि कानातून मनात शिरलेले गाणे ऐकणे यात फरक आहे. शुक्रतारा मंदवारा - पाण्यामध्ये शितल प्रकाश देणारा चंद्र दिसत आहे, आकाशात शुक्रतारा आहे, वाऱ्याची मंद झुळूक अंगावर येत आहे आणि गाण्यांतून स्वप्न वाहत आहे अशा या भावूक क्षणी मन म्हणतेय तू माझ्या डोळ्यात डोळे मिसळून पहा , तू माझ्या जवळ रहा. माझ्या भावना कशा सांगू हे कळत नाही तूच या लाजऱ्या फुलाला समजून घे. हे पवना,  माझ्या भावनांचा गंध तू माझ्या प्रेमा पर्यंत पोहचव. माझ्या लाजऱ्या फुला या भावनांचा सुवास तुझ्या मनात शिरून ह्रदयातील स्पंदनाने हवा आल्हाददायक झाली आहे. थरारे ही हवा हे शब्द मनातील नाजूक भावना दर्शवतात.  या मधुर अशा स्वरांनी मी भारावून गेले आहे तुझ्या जवळ असण्यांने जन्म म्हणजे जीवन व्यापले आहे, आनंदी झाले आहे. मी जे स्वप्नात शोधत होते ते तू माझ्या डोळ्यासमोर आल्यावर जागेपणी मिळेल. तू आणि तूच माझ्या डोळ्यात साठून राहिला आहेस. फुलांनी बहरलेली फांदी जशी वाकते तसे तुझ्या असण्याने माझे जीवन आनंदाने बहरून गेलेय. जीवाचे फुल झालेय आणि मन भारावून गेलेय म्हणूनच " तू असा जवळी राहा " 
 " तू अशी जवळी राहा."
जादुई शब्द लिहिणारे श्री पाडगावकर, आवाजाने मोहून टाकणारे श्री अरुण दाते, श्रीमती सुधा मल्होत्रा आणि स्वरसाज चढवणारे श्री. खळे यांना सलाम.

शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

जीवन

आयुष्य
वाटते घडावे मनासारखे
वाटते रस्ते नसावेत खांचखळग्यांचे, 
म्हणुन काय इच्छाच ठेवायच्या नाहीत ?
रस्ताच सोडायचा कां मार्ग बदलायचा,
निर्वाहासाठी कमी पडत असेल निधी
हसावेसे वाटुन पण टाकावा लागत असेल उसासा,
काळजीपूर्वक चालुन पण बोचत असतील कांटे
करावी लागत असेल काळजी, होउ नकोस निराश, घेउ नकोस माघार , किती वळणं, किती गतीरोधक, अशी जरी असेल वाट,  तरी कमी करू नकोस वेग,
प्रयत्नांना तुझ्या यश देईल दाद,  जीवाला जीव देणारे देतील तुला साथ, देशील जेव्हा साद , मन खुले करून, किल्मीषे झटकुन, मनाची उभारी धरून, करूनी स्वपरीक्षण, 
चालव आयुष्याचे जहाज, पारखुन प्रवासी,  
सोडू नकोस जहाज.
         गिरीश

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

Bhagwadgita

१ -अर्जुन विषाद योग
धृतराष्ट्र म्हणाला हे संजया,  धर्मक्षेत्र असलेल्या कुरूक्षेत्रात युद्धासाठी तयार असलेले माझे पुत्र व पांडुकुमार काय करत आहेत ते मला सांग. संजय म्हणाला,  पांडवांच्या सैन्याचा व्युह पाहुन दुर्योधन भीष्मा जवळ जाऊन म्हणाला,  तुमचा शिष्य  ध्रुष्टद्युम्नाने रचलेला व्युह पहा. पांडवाची ही प्रचंड सेना दले पहा.
अनेक धनुर्धारी आहेत तसेच द्रुपद, सात्यकी, विराट हे ही रणांगणात भीम, अर्जुना समान शोभत आहेत.
वीर असे ध्रुष्टकेतु व चेकितात, महान असे पुरूजित, कुंतिभोज, शैब्य, शूर असा ऊत्तमौजा आणि पराक्रमी युधामन्यु, द्रौपदीचे पुत्र व अभिमन्यु.  द्विजश्रेष्ठा ! आता आपल्याकडील सेनानायक होण्यासारखे प्रधान वीर पण सांगतो. आपण स्वत: सारख्या व्यक्ति व भीष्म, कृपाचार्य,  कर्ण, भुरिश्रवा, अश्वत्थामा आणि विकर्ण.
हे सर्वजण शूर, शास्त्रात पारंगत आणि य़ुद्धात अनुभवी असुन माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहेत. भीष्मरक्षित असे आपले सैन्य दल (बल) अमर्याद आहे. भीमरक्षित सेना मला मर्यादित दिसते आहे व सर्व सैन्याला म्हणाला स्वस्थानावर दक्ष राहुन लक्ष ठेवा व भीष्म रक्षणासाठी तुमचे सामर्थ्य एकटवा. भीष्मानी केलेला शंखनाद हा जणु सिंहनादच वाटतो आहे.  तो ऐकुन दुर्योधनाला अत्यंत आनंद झाला. नंतर शंख, ढोल व रणवाद्यांच्या आवाजाने गगन दुमदुमुन गेले.
शुभ्र अश्व रथात बसुन पांडव व श्रीकृष्ण आले. त्यांनी त्यांचे दिव्य शंख स्व प्राणाने फुंकले. कृष्ण व अर्जुनाने पांचजन्य, देवदत्त हे शंख फुंकले. भीमाने स्वत:चे नाव धन्य करणारा पांड्रु महाशंख फुंकला. कुंतीपुत्र युधिष्ठीराने अनंत विजय फुंकला. नकुल व सहदेव यांनी
चांगला आवाज करणारा मणिपुष्पक फुंकला. सात्यकी, विराट, सेनापती धृष्टद्युम्न,  द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, आणि हे राजा ! अभिमन्यु हे पण वेगवेगळे शंख वाजवत आहेत. या सर्वांच्या प्रचंड आवाजाने आकाश व पृथ्वी थरथरु लागली आहे. धृतराष्ट्र पुत्रांच्या ह्रदयाचा थरकाप झाला आहे. ज्याच्या रथावरील ध्वजावर हनुमान आहे अशा अर्जुनाने कौरव युद्धासाठी सज्ज आहेत असे पाहून आपले धनुष्य उचलले आहे.
कृष्णाशी अर्जुन काय बोलत आहे पहा । अर्जुन म्हणाला , हे अच्युत रथ सैन्यांच्या मधोमध नेउन ठेव. मला येथे युद्धासाठी कोण कोण आले आहे ते पहावयाचे आहे. कोण राजे जमलेले आहेत व कोण कौरवांचे बाजुनी लढण्यासाठी आले आहेत ते पहातो. अर्जुनास दिसले ते सर्व त्याचे चुलते, वाडवडील, गुरूबंधु, पुत्र पौत्र, मित्र, मामा. दोन्ही सैन्यामधे मित्र व नातेवाईक दिसले. असे सर्व रक्ताच्या नात्याचे लोक पाहून करुणेने व्याकूळ होऊन अर्जुन दु:खाने म्हणाला,  हे सर्व माझेच आप्त आहेत. माझ्या घशाला कोरड पडते आहे, शरीर शिथील पडु लागले आहे, शरीराला कंप येतोय, धनुष्याचे त्वचेला चटके बसत आहेत. माझे मन भरकटते आहे, ऊभे राहणेही अशक्य झाले आहे.
केशवा ही उलटी(विपरीत) लक्षणे दिसत आहेत. आपल्या प्रिय अशा सर्वाना मारुन कोणते श्रेय मिळवायचे. कृष्णा, मला विजय नको, अशा राज्याचे भोग मला कदापिही नकोत. या रणांगणावर जे आपले प्राण व धनाचा विचार न करता युद्धासाठी ऊभे आहेत त्यानाच राज्य सुख द्यावे. गुरुजन, मुले, आजोबा, सासरे, मेहुणे, नातु, मामा, नातेवाईक, याना जरी यांनी मला मारले तरी मारु इच्छीत नाही. मला पृथ्वीच काय त्रिलोक पण नको. या धृतराष्ट्र पुत्राना मारुन काय सुख मिळणार. यांना मारले तर पापच लागेल. हे कृष्णा कौरवाना मारण्यात मला कुठेच सुख दिसत नाही. मित्र द्रोह, कुळ नाशा सारखे हे पाप आहे. लोभी अशा याना काही दिसत नसले (कळत नसले)  तरी हे जनार्दना, मी हे पाप का करु? (या पापाचा त्याग का नको करु). याचा परिणाम म्हणजे कुळाचा नाश होणार आहे हे कळत का नाही ?. पुर्वापार चालत आलेले कुलधर्म बुडवुन कुळाचा नाश होईल. कुळामधे अधर्म पसरेल. कृष्णा, धर्म सोडला तर लेकी सुना बिघडतील. हे देवा , वर्ण संकराचे  संकट कोसळेल.(अवांछित प्रजा निर्मिती चे) कुळातील तर्पण श्राद्धे थांबतील. कुळ आणि कुळ बुडव्याना नरकात जावे लागेल.
वर्ण संकर दोषाने कुळाचा घात करणाऱ्यांचे जाती धर्म उखडले जातील. हे जनार्दना, मी असे ऐकले आहे की , कुलधर्म संपताच मनुष्याला अनंत काळासाठी नरकात जावे लागते. आम्ही बुद्धिमान असुनही हे महा पाप करण्यास तयार झालो आहोत. सुख आणि राज्य लोभाने मारण्यासही तयार आहोत. मला निशस्त्र राहुन, कौरवानी जरी शस्त्र घेउन प्रहार केला तरी प्रतिकार न करणेच योग्य वाटते. असे बोलुन अर्जुन शोकमग्न होउन धनुष्य बाण खाली ठेवुन रथा मधे बसला.
अर्जुन विषाद योग नावाचा हा प्रथम अध्याय.

बुधवार, २२ मे, २०१९

Autobiography of a Yogi

मी 'Autobiography of a yogi '  हे स्वामी परमहंस योगानंद यांचे अंजली गोखले यांनी अनुवादित केलेले पुस्तक वाचले.
श्री स्वामी परमहंस योगानंद , परमावतार बाबाजी व भारतीय गुरुपरंपरेला वंदन करून मी या ग्रंथाबद्दल लिहित आहे.
स्वामी  परमहंस योगानंद हे ' स्वामी ' पदाला कसे पोहचले या वाटचालीतील अनुभव  व आध्यात्मिक प्रगती तसेच त्यांचे कार्य याबद्दल वाचणे हा एक सात्विक अनुभव आहे.
यामध्ये आपल्याला " सिद्ध पुरुष " , व क्रियायोग यां‌‌ची माहिती मिळते , आपले आध्यात्मिक ज्ञान किती उच्च पातळीचे आहे ते कळते. परदेशा मधे क्रियायोगाच्या प्रसाराचे महान कार्य करणाऱ्या ' स्वामींंचे ' अनुभव वाचणे व समजून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे असे मला वाटते.
सदर चरित्रातील प्रत्येक विभागाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
बालपण -
सुरुवातीलाच स्वामींनी गुरुशिष्य संबंध व
'परमतत्वाचा शोध ' ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये समजली जातात आणि  त्यांच्या आयुष्यातील मार्ग त्यांना परमेश्वर स्वरूप ऋषीतुल्य गुरूंकडे घेऊन गेला असे सांगितले आहे.
आठवणी - स्वामींना ते मागील जन्मी ' योगी ' म्हणून हिमालयात राहत हे आठवत असे.
ते म्हणतात की माझ्या लहानपणच्या आठवणी विलक्षण अशा नाहीत.
श्री भगवतीचरण घोष यांचे ते चवथे अपत्य. नांव मुकुंदलाल. चार भाऊ व चार बहिणी असे कुटुंब होते. वडिल असाधारण गणितज्ञ व तर्कशास्त्री होते. आई या भावंडांना धर्मग्रंथातील गोष्टी सांगत असे व वळण लावीत असे. आईचा दानधर्माकडे कल होता .
वडिलांचे वागणे शिस्तबद्ध होते. त्यांनी रेल्वेत नोकरी करत असताना बोनस साठी अर्ज केला नाही. नंतर हिशेब तपासणी मधे हे लक्षात आल्यावर त्यांना १२५००० रू. देण्यात आले. तेव्हा ते म्हणाले ' एवढे काय पैशासारख्या बाह्य फायद्यानी फुशारून जायचे.' ते लाहिरी महाशयांचे  शिष्य कसे झाले ही गोष्ट महत्त्वाची आहे. घरात लाहिरी महाशयांचे छायाचित्र होते. या छायाचित्रा समोर मुकुंदलाल ध्यान लावून बसत. या छायाचित्राने त्यांच्या जीवनावर प्रभावी परिणाम केला होता.
स्वामी आठ वर्षांचे असताना त्याना छायाचित्रातुन आशिर्वाद मिळाले. मुकुंदलालना कॉलरा झाला व त्यावर डॉक्टरी उपाय चालत नव्हते तेव्हा आईने त्यांना उशाशी टांगलेल्या लाहिरी महाशयांच्या छायाचित्राकडे नमस्कार करून पाहण्यास सांगितले , त्याप्रमाणे त्यांनी केले असता खोलीला व मुकुंदलाल याना दिपवून टाकणारा प्रकाश दिसला व रोगाची लक्षणे निघून गेली व ते बरे झाले. त्यानंतर ध्यानामध्ये हिमालयामधील योगींबरोबरच्या संवादातून परमेश्वराचा शोध घेण्याची त्यांची जिज्ञासा दृढ झाली.