रविवार, २८ एप्रिल, २०१९

पुस्तक परिचय

श्री.वि.स.वाळींबे - पराजित अपराजित.

पूर्ण पुस्तक वाचुन झाल्यानंतर मला असे वाटले की ज्या राष्ट्राला असे पराजित, कचखाऊ नेते लाभत गेले ते एक बलाढ्य राष्ट्र कसे झाले?.  
  अर्थात अधुनमधून लाभणारे समर्थ नेतृत्व हे त्याचे कारण असेल, संपूर्ण विनाश होईल असे वाटत असताना एखादा अपराजित वृत्तीचा नेता त्यांना लाभला. पहिल्या महायुद्धाच्या काळात 'क्लेमेन्सो' तर नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 'द गॉल'. परंतु क्लेमेन्सों पेक्षा फ्रान्सच्या प्रगतीमध्ये गॉल यांचा वाटा आहे.
  फ्रान्स एक बलिष्ठ राष्ट्र रहावे हे त्यांचे स्वप्न होते आणि त्यांनी ते खरे केले. गॉल यांच्या जीवनातील चढ उतार हा एक निराळा विषय होऊ शकेल. एका लेखकाने लिहिले की 
"आम्हीं फ्रेंच मोठी बेजबाबदार माणसं आहोत जेव्हा देशात अशांतता असते तेव्हा आम्हाला शांततेचा ध्यास लागलेला असतो आणि जेव्हा शांतता असते तेव्हा आम्हाला गोंधळाची, अशांततेची आस लागलेली असते." आणि या वृत्तीचा पुरावा क्षणोक्षणी मिळतो. त्यातच गॉल काही करत असता त्यांच्या पक्षाला कसेबसे  बहुमत मिळाले या घटनेचा समावेश होतो. कमालीची बेजबाबदार वृत्ती सर्वच राजकीय नेत्यांची होती म्हणून च १०० पेक्षा जास्त वेळा बदललेली मंत्री मंडळं या देशात दिसतात. तिसरे प्रजासत्ताक सतत अस्थिर अवस्थेत राहिले. विटंबना सहन  करावी लागली.
 जोफ्र, फॉश, गॉल यासारखे खंदे सेनापती या देशाला लाभले हे भाग्य.
  मानवी मनाचे मासलेवाईक नमुने यांत आढळतात. त्यामध्ये बुलांजे हा सेनापती येतो. खूप लोकप्रियता त्याने मिळवली आणि लष्करी राजवट आणण्याची संधी त्याला लाभली त्यावेळी एलिसे प्रासाद ताब्यात घेण्यासाठी जाणे जरुरीचे होते तेव्हा तो आपल्या प्रेयसीच्या महालात शिरला आणि बाहेर येईपर्यंत संधी गेलेली होती. 
त्यानंतर देरूलेद नावाच्या सेनापतीला प्रजासत्ताक उलथून टाकून एलिसे प्रासादात शिरण्याची संधी मिळाली पण ज्या सेनापती ची मदत घेण्यास तो गेला तो महत्त्वाकांक्षी नसल्याने (जनरल रोजे) त्याने देरुलेदलाच अटक केली आणि प्रजासत्ताक वाचले. या दोन घटना अनुक्रमे २७ जानेवारी १८८३ व २३ फेब्रुवारी १८९९च्या. 
तीसरी घटना आहे ६ फेब्रुवारी १९३४ची. या काळात राज्य कर्ते किती भ्रष्टाचारी आहेत याची जाणीव जनतेला झाली होती. अनेक प्रकरणे उजेडात आली होती. त्यामुळे प्रजासत्ताका बद्दल लोकांचे मत कलुषित झाले होते. वर्तमानपत्रांचा समाज मनावर मोठा प्रभाव पडतो. समाजमनाची जडणघडण वृत्तपत्रे करत असतात. वृत्तपत्रांनी प्रक्षोभक लेख लिहून लोकांना निदर्शने करण्यास प्रवृत्त केले. 
या वृत्तपत्रांमध्ये जे एक महत्त्वाचे होते त्याचे संपादक एक मासलेवाईक नमुना आहेत. त्यांनी भडक लेख लिहिल्यावर प्रणय कविता लिहिण्यात वेळ घालवला. आणि कार्यकर्ते सल्ला मागायला आल्यावर उद्या बघू असं उत्तर दिले. 
नादान नेतृत्व कार्यघात करतेच, पण आपल्या अनुयायांना फशी पाडते. 
चाळीस हजार निदर्शक''प्रजासत्ताक मुर्दाबाद' अशा घोषणा देत प्रतिनिधी सभागृहाच्या दारावर धडका होते. 
या परीस्थितीचा फायदा करून घ्यावा हे या नेत्यांना कळले नाही. हे नेते लपून हुकूम सोडत होते ही एक आश्र्चर्य जनक गोष्ट होती. आणि कहर म्हणजे हा की प्रतिनिधी सभेच्या दारात लोक पोहोचल्यावर त्यांच्या नेत्याने चक्क माघार घेण्यास सांगितले की जे अत्यंत मुर्खपणाचे होते. या माघार घेण्याला कारण नव्हते, सरकारी प्राबल्य संपले होते. अशा रितीने या मानवी मनामुळे तीसरे प्रजासत्ताक परत वाचले. 
फ्रान्सच्या इतिहासात " द्रेफ्यु "प्रकरणाला महत्व आहे. जवळ जवळ १२ वर्षं हे प्रकरण चिघळत राहिले होते. हा काळ जातियवादाची भयानकता दर्शवणारा आहे.
केवळ द्रेफ्यू हा ज्यू असल्याने त्याला दोषी ठरविण्याचा केला गेलेला प्रयत्न म्हणजे नैतिक अध:पतनाची परिसीमा आहे. 
या काळात सरकारी प्रतिष्ठेचे धिंडवडे निघत होते. 
सर्वजण या गोंधळात असताना राजनिष्ठ गटाने सत्तेसाठी प्रयत्न केले पण अयशस्वी. 
या काळात देशकारणाकडे शासन संस्थेचे दुर्लक्ष झाले. फ्रान्सच्या आर्थिक प्रगती चा वेग मंदावला होता. समाजकल्याणाच्या कार्यक्रमाना चालना मिळाली नाही. परराष्ट्रीय धोरणाची उपेक्षा झाली.
पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी "पेतॉ " सारख्या पराजित वृत्ती च्या पंतप्रधानामुळे  जर्मनी पुढे शरणागती पत्करली. 
पण "  गॉल " सारख्या अपराजित वृत्ती च्या नेतृत्वामुळे फ्रान्स सर्वनाशातुन वाचलाच पण नंतर प्रगती झाली व फ्रान्सला प्रतिष्ठा प्राप्त झाली.
गिरीश 

बुधवार, २४ एप्रिल, २०१९

ऑपरेशन ऐंटेबी

ऑपरेशन ऐंटेबी.
रवींद्र गुर्जर

फ्रेंच विमानाचे दहशतवाद्यांकडून अथेन्स मधुन अपहरण झाले. त्या विमानामध्ये ज्यु, इस्राएली, प्रवासी जास्त होते.  इतरही देशांचे प्रवासी होतेच. 
  युगांडा दहशतवाद्यांना सहकार्य करत असल्याने विमान युगांडातील एन्टेबी येथे उतरविण्यात आले.
 तेथे युगांडाचे सैनिक व दहशतवाद्यांच्या पहाऱ्यात सर्वांना एका इमारतीत ठेवण्यात आले. 
    इस्राएली व ज्युंना बाजूला काढण्यात आले.
 हे विमान फ्रेंच असल्याने फ्रेंच सरकारने हस्तक्षेप करावा अशी इस्राएल सरकारने विनंती केली. दहशतवाद्यांनी त्यांच्या मार्फत वाटाघाटी करण्याचे मान्य केले.  इदी अमीन पुर्णपणे दहशतवाद्यांच्या बाजुने होते. खरेतर आधी इस्राएल बरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. परंतु एकदा त्यांनी शस्त्र पुरवठा नाकारल्याने ते बिघडले.             
  वाटाघाटी सुरु झाल्या नंतर दहशतवाद्यांना
 इतर देशांतील कैदी सोडावे असे सांगितले. त्यामुळे काही इतर देशांतील नागरिकांना सोडण्यात आले.  अमीन ज्यू नागरिकांची चौकशी करण्याचे , त्यांना मदत करण्याचे नाटक पुरेपूर वठवत होते. त्यांचे इस्राएल मधील मित्र बार लेव्ह यांनी अमीन यांना फोन करून त्यांची भरमसाट स्तुती केली व सांगितले की तुम्ही जर या लोकांना सोडविण्यात यश मिळविले तर तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळेल. अमीन म्हणाले की दहशतवाद्यांकडे खूप स्फोटक द्रव्ये आहेत, मी तसा प्रयत्न केल्यास ते सर्व प्रवाशांना ठार मारतील. 
  हे संभाषण इस्राएल सरकारला कळले.
अमीन यांचे हेतू स्पष्ट झाले होते. इस्राएल संरक्षण दलाने एक योजना आखली. त्यांची योजना एक हवाई लष्करी पथक पाठवून या प्रवाशांना मुक्त करण्याची होती. दहशतवाद्यांनी गुरुवार अंतिम मुदत दिली. इस्त्रायली सरकारने वाटाघाटी करण्यास मान्यता दिली, पण त्या लांबतील  अशी व्यवस्था केली. तातडीची बैठक झाली, त्यात सगळ्यांचे मत पडले की आता माघार घेणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे आहे. तेव्हा या मागण्या मान्य करता कामा नये. संरक्षण मंत्र्यांनी आपली योजना सर्वांकडे मांडली. परंतु त्यात खूप अडचणी होत्या. त्यासाठी जी अमेरिकन विमाने वापरावयाची होती ती वापरल्यास अमेरिका शस्त्र पुरवठा बंद करण्याची शक्यता होती. कारण हा पुरवठा बाह्य आक्रमण झाल्यास आत्म संरक्षण करता यावे अशा दृष्टीने केला जातो. दुसरी गोष्ट योजना असफल ठरल्यास वैमानिक पथक आणि सर्व प्रवासी यांचा मृत्यू अटळ होता. आणि परीणामी मंत्री मंडळ ढासळण्याची शक्यता होती.                                             अखेर निरपराध लोकांचे जीवन ही गोष्ट महत्त्वाची मानली जाऊन या योजनेला मान्यता देण्यात आली. या योजनेला ऑपरेशन जोनाथन असे नाव देण्यात आले कारण या मोहिमेचे प्रमुख होते जोनाथन उर्फ यॉनी. हे एक हुशार व कार्यक्षम असे अधिकारी होते. त्यांनी सर्व योजना राबवली.
 अनेक वेळा हल्ल्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आणि ग्रीन सिग्नल मिळताच हवाईदलाची  हर्क्युलस जातीची उत्तम दर्जाची विमाने हवेत उडाली. त्यांनी रडार क्षेत्रात न येण्याच्या दृष्टीने ढगाखालुन कमी उंचीवरून प्रवास केला व ती यशस्वीरित्या एन्टेबीत पोचली. तेथील एका दुरच्या धावपट्टीवर उतरली.  रडार केंद्रातील लोकांच्या गाफील गिरी मुळे ही गोष्ट अधिक सोपी झाली. विमानातून उतरल्या उतरल्या इस्त्रायली सैनिकांनी वादळी वेगाने कामे केली. ज्या इमारती मध्ये दहशतवादी व प्रवासी होते तेथे जाऊन दहशतवादी व युगांडा सैनिक याना मारुन ती इमारत तसेच  दळणवळण  खात्याची इमारत, रडार केंद्र ताब्यात घेतले.  तिथे असलेल्या एका टॉवरवरून युगांडा सैनिकांनी प्रतिहल्ला चालू केला. त्याला स्वतः जोनाथन प्रत्युत्तर देत होते पण अचानक काही कारणाने ते वळले व त्यांच्या पाठीत गोळी लागून ते मरण पावले.
इस्राएल सैनिकांनी त्यांना बाजूला नेऊन ठेवून काम चालु ठेवले. तिकडे सर्व प्रवासी घाबरले होते त्यांना वाटत होते की आपल्या सरकारने बोलणी बंद केल्याने दहशतवादी आपल्याला मारण्यासाठी आले असावेत. 
पण लवकरच त्यांच्या लक्षात सर्व गोष्टी आल्या व ते शूर सैनिकांच्या आज्ञे प्रमाणे विमानाकडे पळत सुटले. प्रवासी, जखमी , मृत सैनिक आणि जोनाथन याना पण विमानात सुरक्षितपणे आणण्यात वैद्यकीय पथकाने यश मिळवले. सर्वच्या सर्व प्रवासी एक हॉस्पिटलमध्ये असलेल्या बाई वगळता विमानात आले व विमाने सुरक्षितपणे इस्राईलमध्ये पोचली.             
   त्याचवेळी बार लेव्ह यांनी अमीन यांना फोन करून धन्यवाद दिले. तेव्हा अमीन गोंधळले व म्हणाले धन्यवाद कशासाठी मी अजून काहीच केले नाही , तुम्ही लवकर आपला निर्णय कळवा नाही तर दहशतवादी प्रवाशांना ठार मारतील तेव्हा लेव्ह नुसते हसले. थोड्या वेळाने परत अमीन चा लेव्ह यांना फोन आला.  ते म्हणाले मैत्रीने दगा दिला. तुम्ही केलेले हे कृत्य लांच्छनास्पद आहे. माझा एक विमानतळ नष्ट झालाच पण काही सैनिक मारले गेले. आणि शेवटी फोन ठेवताना ते म्हणाले 'एक राजकीय नेता किंवा अध्यक्ष म्हणून नाही तर एक खंदा सेनापती या नात्याने मी तुम्हाला सांगु इच्छितो की हा पराक्रम अद्वितीय आहे, तुमच्या विमान दलाला व राष्ट्राला भूषणावह आहे.

.